विषवृत्तावर सूर्य येतो तो 21 मार्च रोजी. याच्या जवळपास होळीचा सण येतो. उष्णता वाढीस लागते. होळी लावल्याने जमीन तापते, जमिनीलगतचा थर तापतो. यावेळी होळी लावल्याने उष्णता वाढते. म्हणजे कमी दाबाचा पट्टा तयार होऊन पाऊस चांगला पडतो. हे यामागील विज्ञान असावे. देवालयासमोर, मोकळ्या मैदानात होळी लावावी. होळी लावल्यावर पालथ्या हाताने बोंब मारतात. यामुळे मनातील वाईट प्रवृती शांत होतात. असे पुजारी प्रवीण कुलकर्णी यांनी सांगितले. तसे धुळवड व रंगपंचमी अशी या उत्सवाची स्थाननिहाय विभागणी होते. तर काही ठिकाणी तो एकत्रितरीत्या साजरा होतो. फाल्गुनी पौर्णिमेपासून ते फाल्गुन वद्य पंचमीपर्यंत दोन दिवस ते पाच दिवस हा उत्सव साजरा केला जातो. ही परंपरा यावर्षीही कायम आहे. आज होळी दिनानिमित्त घरोघरी महिला पहाटे उठून सडा रांगोळी काढून एकमेकांना होळीच्या शुभेच्छा दिल्या. तसेच संध्याकाळी मोठ्या उत्साहात होळी पेटविली जाणार आहे. यावेळी दुर्गुणांची होळी करून आपुलकी, प्रेमाचे रंग भरण्याचा संदेश दिला जाणार आहे. काही शाळा, महाविद्यालयात होळीनिमित्त आज सकाळीच रंगाची उधळण करून होळीच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
शेतकरी वर्गातही होळीचा उत्साह
शेतकरी वर्गातही होळीचा उत्साह दिसून आला. भारतातील शेतकरी वर्गात होळी या सणाचे खास महत्त्व आहे. पौराणिक इतिहास पाहता या सणाचे आणि कृष्ण-बलराम यांचे नाते दिसून येते. होळीच्या निमित्ताने या दोन्ही देवतांचे स्मरण आणि पूजा करतात. यादिवशी हाती आलेल्या पिकाबद्दल देवाला धन्यवाद देण्यासाठी प्रार्थना करतात. होळीच्या दुसर्या दिवशी गव्हांच्या ओंब्या भाजण्याची प्रथा आहे. या दिवसात गव्हाचे पीक तयार होते हे त्यामागील कारण असू शकते. नवीन पीक अग्नी देवतेला समर्पित करण्याचीही प्रथा आहे. ही परंपरा यावर्षीही कायम ठेवली जाणार आहे.